नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाच ते उद्घाटन करणार आहेत. तसेच अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचे सकाळी सुमारे 11:15 वाजता उद्घाटन करतील आणि नवीन वंदे भारत, अमृत भारत ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील.
अयोध्येतील रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात आला आहे. या रेल्वे स्टेशनचे ते उद्घाटन करणार आहेत. हे स्टेशन अयोध्या धाम म्हणून ओळखले जाणार आहे. अयोध्येच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यासोबतच ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
सुमारे 12:15 वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.
अयोध्या आणि तिच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे.