चेन्नई : आईच्या दुधाचा बाजार मांडणाऱ्या एका दुकानाचा पर्दाफाश केला आहे. पाचशे रुपयांत आईचे १०० मिली दूध या दुकानांतून विकले जात होते. अनेक बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यावर पाश्चराईज्ड दूध असे नमूद करीत संबंधित मातांचे नावही त्यावर लिहिण्यात आले होते. तामिळनाडूच्या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तिरुवल्लूर येथे हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत प्रशासनाचे अधिकारी डॉ. एम. जगदीश चंद्र बोस यांनी सांगितले की, एका दुकानात आईचे बाटलीबंद दूध विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकांनी या दुकानावर दहा दिवस नजर ठेवली. त्या कालावधीत हे दूध विकण्यात आले नाही. पण शुक्रवारी या पथकाने छापा टाकला असता त्यांना अनेक बाटल्या आईचे दूध आढळून आले. प्रत्येक बाटलीत 100 मिली दूध असून त्यावर पाश्चराईज्ड आईचे दूध असे लेबल लावण्यात आले होते. तसेच त्यावर संबंधित मातेचे नावही लिहिण्यात आले होते.
डॉ. बोस म्हणाले की, मातेचे दूध कोणत्या पद्धतीने पाश्चराईज्ड केले याचा शोध घेतला जात आहे. कायद्यानुसार आईच्या दुधावर प्रक्रिया अथवा विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन परवानगी देत नाही.
रुग्णालयांतील महिलांकडून आणायचे दूध
संबंधित दुकानचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी केली असता त्याने वेगवेगळ्या रुग्णालयांतून महिलांकडून हे दूध आणले जात असल्याचे सांगितले. पण काही आठवड्यांपूर्वी आईचे दूध विकणे बेकायदा आहे, हे समजल्यानंतर आम्ही दूध विक्री बंद केली होती. डॉ. बोस म्हणाले की, नवजात बालकांना गरज असेल तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर मातांचे दूध दिले जाते. मात्र ते खुल्या बाजारात विकता येत नाही.