जिंद : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक पीजीआयमध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिला कैदीवर व्हॅनमध्ये दोन कैद्यांनी बलात्कार केल्याचे वृत्त आहे. दोन्ही कैद्यांनी महिलेला नशायुक्त कोल्ड्रिंक पाजले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. याचा फायदा घेत दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणाच्या रोहतकमध्ये उपचारासाठी आणलेल्या एका महिला कैद्यावर पोलिस व्हॅनमध्ये आणखी दोन कैद्यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेले पोलिस कागदोपत्री कामात व्यस्त होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही आरोपींविरुद्ध जिंद सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल केला. पीडित महिला कैदी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात शिक्षा भोगत आहे. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली होती, परंतु गुन्हा 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी महिला कैदीला पीजीआय रोहतकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात सुरक्षा कर्मचारी कागदोपत्री कामात व्यस्त असताना पोलीस व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या मनीष आणि सतीश या अन्य दोन कैद्यांनी तिला नशामिश्रित शीतपेय प्यायला लावले. यामुळे ती काही काळ बेशुद्ध झाली. त्यानंतर दोन्ही आरोपी कैद्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
झिरो एफआयआर दाखल
आता दोन महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले आहे. रोहतकमध्ये ही घटना घडल्याचे जिंदच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी सुखबीर यांनी मीडियाला सांगितले. त्यामुळे या प्रकरणी झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी रोहतक येथे पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.