पुणे : चीनच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांच्या श्वसनविकाराची नवी साथ आली आहे. या आजारात न्यूमोनियासदृश तापाच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी देण्यात आले आहेत. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, या आजारामुळे तूर्तास आपण काळजी करण्याचे काही कारण नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचवेळी सर्व राज्यांना रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.(Pneumonia Outbreak)
कोरोनाच्या सावटानंतर चीनमध्ये लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पसरलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळय़ामुळे श्वसनविकारांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लहान मुले आणि अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या नाक आणि घशातील स्रावांचे नमुने श्वसन विकार जनुकांच्या चाचणीसाठी राज्यांमध्ये असलेल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.(Central government alert)
आजाराची सद्यस्थिती काय?
- चीनच्या उत्तर भागात गेल्या अनेक दिवसांपासून न्यूमोनियासदृश तापाचे रुग्ण वाढले.
- तीव्र ताप, श्वास घेताना त्रास होणे आदी लक्षणे.
- यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून माहिती मागवली आहे.
- चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा अनुभव असल्याने अनेक देशांकडून खबरदारीची उपाययोजना.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे निर्देश.
जागतिक आरोग्य संघटना दक्ष
जागतिक आरोग्य संघटनेने आजाराबाबत चीनकडून माहिती मागविली आहे. सध्या चीनमधील नागरिकांनी श्वसनविकार टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा. त्याचबरोबर लसीकरणावर तेथील सरकारने भर द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. रुग्णालयातील मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णालयात पुरेशा खाटांची व्यवस्था, इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लशीचा साठा, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविकांसह आवश्यक सामग्रीचा साठा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची तपासणी, व्हेंटिलेटरची कार्यक्षमता चाचणी, संसर्ग नियंत्रण पद्धतीवर भर देण्यात येत आहे. (China Pneumonia Outbreak)