Ayushman Bharat Yojana : मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आयुष्यमान भारत आरोग्य योजना आता 70 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उत्पन्न गटातील 70 वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम मोदींच्या कॅबिनेटने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.
भारतातील 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत (आरोग्य विमा योजना) अंतर्गत लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (दि. 11 सप्टेंबर) ही माहिती दिली. 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे. तर याचा फायदा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना होणार आहे. या योजनेंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे.
70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती विचारात न घेता ते AB PM-JAY चे लाभ घेण्यास पात्र होणार आहेत. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाणार आहे. तर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना स्वतःसाठी प्रति वर्ष रु. 5 लाखांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळणार आहे.