नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आणि कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पहिल्या दिवसाची बैठक शुक्रवारी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात संपली. सुमारे साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीत 10 टक्के मते वाढवण्यासाठी बूथ स्तरावर काम करावे लागेल, असा पहिला विषय मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जर आपल्या योजना गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांपर्यंत योग्य रीतीने पोहोचल्या, तर आपल्याला मतं वाढवायला खूप मदत होईल. यासाठी ज्या राज्यांमध्ये भारत विकास यात्रांचे आयोजन केले जात आहे, त्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
पीएम मोदी पुढे म्हणाले, “नवीन मतदारांना यूपीए सरकार आणि एनडीए सरकारमधील फरक समजण्यासाठी एक विशेष मोहीम चालवली पाहिजे. भाजपच्या बाजूने मते वाढवण्यासाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बूथ व्यवस्थापनाचे उदाहरण दिले. पंतप्रधान पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले, “पक्षाच्या अधिकाऱ्यांनी बूथ व्यवस्थापन हे आव्हान म्हणून घ्यावे. “संघटनात्मक शक्तीनेच विजय मिळवता येतो, त्यामुळे पूर्ण तयारीनिशी जनतेमध्ये जा.”
पीएम मोदी कार्यकर्त्यांना म्हणाले, “गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या चार गोष्टींवर काम करा. अधिकाधिक क्रीडा स्पर्धा आयोजित करा, जेणेकरून अधिक लोक त्यांच्याशी जोडले जातील. नकारात्मकतेला सकारात्मकतेने बदला. आता सर्व कामे मिशन मोडमध्ये करा. “सोशल मीडिया मोहिमांमध्ये आक्रमक व्हा.” बैठकीत ‘विकसित भारत संपर्क यात्रा’चाही आढावा घेण्यात आला.
यानंतर दुसरा विषय राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी मांडला, त्याअंतर्गत ‘विकास भारत यात्रे’सह राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अभिप्राय प्रदेशाध्यक्ष आणि राज्यांच्या प्रभारींनी दिला.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले, तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. संसदेचे हिवाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या एक दिवस आधी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. भाजपच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि विनोद तावडे यांनी नड्डा यांचे सभेच्या ठिकाणी स्वागत केले.