पुणे: विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे. यावर्षी हा सण 29 जून रोजी साजरा केला जाणार आहे. पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे तसेच संसारात सुख-समृद्धी नांदावी, या भावनेने महिला वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. या दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.

वटपौर्णिमेशी सती सावित्री आणि सत्यवान यांची कथा जोडली जाते. पौराणिक कथेनुसार, सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, भक्ती आणि तपश्चर्येच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. या घटनेच्या स्मरणार्थ विवाहित महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. यंदा पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3 वाजून 7 मिनिटांनी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5 वाजून 27 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीचा विचार करता 29 जून रोजीच व्रत करणे योग्य मानले जाते.

पूजेसाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी शुभ मानला जातो. सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपासून सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत महिला पूजा करू शकतात. मात्र, सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपासून 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत राहूकाळ असल्याने या वेळेत पूजा टाळण्याचा सल्ला दिला जातो.
पूजा सुरू करण्यापूर्वी हातात फुले, अक्षता आणि पाणी घेऊन पतीच्या उत्तम आरोग्याचा व दीर्घायुष्याचा संकल्प करावा. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद, कुंकू आणि फुले अर्पण करून ‘मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः’ हा मंत्र म्हणावा. यानंतर माता सावित्रीची प्रार्थना करून वडाच्या झाडाभोवती सुती धागा गुंडाळावा आणि प्रदक्षिणा घालावी. पूजेदरम्यान सावित्री-सत्यवानाची कथा ऐकणे किंवा वाचणे शुभ मानले जाते. तसेच ‘सावित्र्यै नमः अखंड सौभाग्य दायिनी नमः’ या मंत्राचा जप करून पती आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी.







