नवी दिल्ली : पेटीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. गुप्ता यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर पेटीएमच्या सीईओपदी राकेश सिंह यांची निवड करण्यात आली.
राकेश सिंह यांची पेटीएम मनी, वन 97 ची संपत्ती व्यवस्थापन शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर पेटीएम मनीचे प्रमुख असलेल्या वरुण श्रीधर यांना पेटीएम सर्व्हिसेसचे सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. असे जरी असले तरी भावेश गुप्ता आता सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतील. वर्षाच्या अखेरीस पेटीएमच्या वाढीच्या उपक्रमांसाठी ते मार्गदर्शन करतील.
यापूर्वी, पेटीएम पेमेंट्स बँकेचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे बिगरी कार्यकारी अध्यक्षपद सोडले होते. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होते. मात्र, पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर अनेक बोर्ड सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राकेश सिंह हे नवे सीईओ असणार आहेत.