पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने नरसंहाराचे रूप घेतले आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेत.
याआधीही झालाय नरसंहार
पापुआ न्यू गिनीत नरसंहाराची ही पहिलीच घटना नाही. गेल्यावर्षी अशाच हिंसाचारात 150 हून अधिक नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संपूर्ण प्रांतात नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आदिवासी लोकांना ट्रकच्या मागे बांधून अक्षरश: फरफटत नेलं जात होतं. इथं प्रत्येकाच्या हत्येची कहीनी अंगावर काटा आणणारी आहे.
का होते हिंसा?
पापुआ न्यू गिनीतील डोंगराळ भागात आदिवासी गट आहेत. शतकानुशतके त्यांच्यात भांडणं आहेत. आधी दगड, काठ्या, भाले अशा शस्त्रांनी हल्ले करणारे हे गट आता आधुनिक शस्त्रांचा वापर करत आहेत. त्यामुळे हिंसाचार अनेक पटींनी वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी या हिंसाचारात SLR, AK-47, M4, AR15 आणि M16 रायफल्स सारख्या शस्त्रांचा वापर केला.
पापुआ न्यू गिनीत तरुणांची मोठी संख्या आहे. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. उपजीविकेचे संकट आलं की तरुण हिंसाचाराकडे वळतात. कोण वरचढ यासाठी हे आपसात भांडत आहेत. इथे जमिनीचा वाद, आर्थिक फसवणूक, मैत्री आणि नातेसंबंधापर्यंतच्या वादांवरून रक्त सांडले जात आहे.
हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकारचा वापर केला जात आहे. पण हिंसा थांबवण्यात सरकारला अपयश येत आहे. अनेक गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांचीही निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. हत्यापण अतिशय क्रुरपणे केली जाते.