जम्मू : जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवादी हल्यामध्ये 27 पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. यावेळी दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची देखील माहिती समोर येत आहे.
एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नावे समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामधील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली आहे. दहशतवादी हे पोलिसांच्या युनिफॉर्मध्ये आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
दरम्यान पुण्यातील पाच जणांचे कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह संबंधित कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो क्लिक करत होते. त्याच वेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले.
दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली. त्यांना नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्ये करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर थेट गोळीबार केला. सदर कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामधील एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या त्याची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी झाला आहे.
दरम्यान या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच नवीन लग्न झालेल्या एका जोडप्यातील पुरुषालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आहेत.