कर्नाटक: कर्नाटकातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथे खाजगी बसमध्ये मुलांसमोरच आईवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बस चालक, कंडक्टर आणि हेल्परने चन्नपुरा गावाजवळ महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्चला पीडित महिला आपल्या 2 मुलांसह उच्चंगीदुर्गा मंदिरात गेली होती. तेथे दर्शन घेतल्यानंतर महिला आपल्या मुलांसोबत सायंकाळी दावणगेरे येथे परत येताना शेवटची बस पकडली. बसमध्ये तेव्हा 7 ते 8 प्रवासी होते. बस मधील सर्व प्रवासी उतरले.
त्यानंतर बस चालकाने बस एका निर्जनस्थळी नेली. मुलांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून त्यांचे हात बांधले. नंतर बस चालक, बस कंडक्टर आणि एका व्यक्तीने मुलांसमोरच महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला.
दरम्यान, पीडितेने आरडाओरड केला. आवाज ऐकून जवळचे शेतकरी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी महिलेला बचावले. तसेच शेतकऱ्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली. यातील तिन्ही आरोपींमधून एकावर आधीच 7 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, एसपी अरासीकेरे यांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे.