केरळ : केरळमधील त्रिशूरमधील एका रेस्टॉरंटमधील बिर्याणी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर १७८ हून अधिक लोक आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी पडलेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळमधील घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या बिर्याणीमुळे अनेक लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे बोललं जात असून यातील एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. उझैबा असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून कुटीलक्कडव येथील रहिवासी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेल्या परिंजनम येथील रेस्टॉरंटमध्ये शनिवारी अनेकांनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर या लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याने पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होवू लागला. त्यामुळे सर्वाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, एका महिलेचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या महिलेसह तिचे दोन नातेवाईकही तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्टॉरंटला सील केले. कुझीमंथी नावाच्या डिशसोबत मेयोनीज खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं जातं आहे. कुझीमंथी ही बिर्याणीप्रमाणे असणारी एक लोकल डिश आहे. त्यामुळे लोक आजारी पडले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ रेस्टॉरंट सील केले.
दरम्यान, बिर्याणीतून विषबाधा झाल्याने हॉटेल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या घटनेबाबत कायपामंगलम पोलीस स्टेशन आणि पेरिंजनम पंचायत येथे अधिकृत अहवाल दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे.