नवी दिल्ली: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सोरेन हे इंडिया आघाडीच्या मजबूत नेत्यांपैकी एक आहेत.
मात्र, ईडीच्या तावडीत असलेले ते एकमेव मुख्यमंत्री नाहीत. हेमंत सोरेन यांच्याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातही ईडी चौकशी करत आहे. यामध्ये दिल्लीपासून केरळपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांचाही समावेश आहे. या बातमीत त्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेऊया.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल अलीकडेच ईडीच्या रडारवर आहेत. तपासासंदर्भात चौकशीसाठी ईडीने त्यांना आतापर्यंत 5 समन्स पाठवले असून, त्यापैकी एकाही समन्समध्ये ते हजर झाले नाहीत. केजरीवाल यांच्या अटकेबाबत वेळोवेळी अफवांचा बाजारही तापतो. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांच्याविरोधात ईडी चौकशी करत आहे.
त्याचबरोबर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याविरुद्धही ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. विजयन यांच्या विरुद्ध 1995 च्या एका प्रकरणात ईडी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास करत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध भारती सिमेंटच्या आर्थिक प्रकरणांबाबत चौकशी सुरू आहे.
पहिल्यादांच मुख्यमंत्री झालेले रेवंत रेड्डी रडारवर
तेलंगणामध्ये नुकतेच काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले असून रेवंत रेड्डी हे पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. रेवंत रेड्डी यांचीही मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. रेड्डी यांच्यावर 2015 मध्ये एमएलसी निवडणुकीत त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी नामनिर्देशित आमदाराला 50 लाख रुपयांची लाच दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.