नवी दिल्ली: भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी दाऊदला विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्याचा दावा केला होता. दाऊदबाबत सुरू असलेल्या बातम्यांना दुजोरा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, एका वृत्त वाहिनीनी दाऊदचा व्याही जावेद मियांदादशी संवाद साधला.
कुख्यात दाऊद इब्राहिम हा शेवटची घटका मोजत असून पाकिस्तान सरकारने हे वृत्त दाबले असल्याची चर्चा सुरू होती. पाकिस्तान सरकारने जावेद मियांदाद यालाही नजरकैदेत ठेवले असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, जावेद मियांदादने या वृ्त्ताचे खंडन केले आहे. आपल्याला कोणीही नजरकैदैत ठेवले नसल्याचे त्याने म्हटले आहे. जावेद मियांदादने दाऊदच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.
जावेद मियांदादने सांगितले की, दाऊद इब्राहिमवर मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर मी काहीही बोलणार नाही. दाऊदवर जे काही बोलायचे ते पाकिस्तान सरकार सांगेल, असेही त्याने स्पष्ट केले.
दरम्यान पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अशी चर्चा आहे की दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो कराचीतील एका रुग्णालयात मृत्यूसोबत झुंजत आहे. या वृत्ताला दुजोरा देण्याचे धाडस पाकिस्तानात कोणाचेही नाही. कोणीही त्याबाबत भाष्य केल्यास त्याच्यावर कारवाई होईल, असेही काझमीने म्हटले होते.