Nitish Kumar Resignation : बिहारमधील राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज सकाळी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच ते भाजपसोबत युती करून नवीन सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार हे 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार यांनी राजीनामा देण्यापूर्वी, जेडीयू विधिमंडळ पक्षाची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यामध्ये सर्व आमदारांना त्यांच्या एनडीएमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत.
राजभवनात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
दरम्यान, राजभवनात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. नवीन जेडीयू-भाजप सरकार आज संध्याकाळीच शपथ घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी जेडीयू आमदारांच्या बैठकीदरम्यान नितीश कुमार यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी फोनवर चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. ते कोणत्या भाजप नेत्याशी बोलले हे स्पष्ट झाले नाही. येथे भाजपने पाटणा कार्यालयात पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावड यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आणि समर्थन पत्रावर सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.