पाटणा : देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळपास हाती येताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून बिहारमधील राजकारण वेगळ्या वळणावर जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत म्हणजेच दुपारी ४ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला २९१ धावांची आघाडी दर्शवत असून इंडिया आघाडीला २३६ जागांवर आघाडी दिसत आहे.
त्यामुळे देशात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून बड्या नेत्यांचे एकमेकाना संपर्क सुरु असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलताना दिसत आहे. देशात महत्त्वाची राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र राज्यात भाजप आघाडीच्या जागा घटल्या आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भेट नाकारल्याने त्यांच्या भूमिकेवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील बडे नेते नितीश कुमार यांच्या संपर्कात आहेत. नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही दिवसांत बिहारसह देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे दिसून येत आहे.
नितीश कुमार यांची भूमिका महत्वाची
दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीला गेले आहेत. तर भाजपने संख्याबळासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.