कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. संदेशखळीमध्ये ईडीच्या टीमला टार्गेट केल्यानंतर आता एनआयएवर हल्ल्याच्या बातम्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता केंद्रीय एजन्सी एनआयएच्या टीमवर पूर्व मेदिनीपूरच्या भूपतीनगरमध्ये हल्ला करण्यात आला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एनआयएचे पथक शनिवारी तपासासाठी गेले. तपास करणाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
तपास पथक दोघांना चौकशीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयएचे अधिकारी या परिसरात झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी भूपतीनगर येथे गेले होते. जेव्हा एनआयएचे पथक दोन जणांना येथून घेऊन जात होते, त्याचवेळी गावकऱ्यांनी एनआयएच्या वाहनाला घेराव घातला आणि दोघांच्या सुटकेची मागणी करत कारवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी काही लोकांनी वाहनावर दगडफेकही केली. या हल्ल्यात एनआयएचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी एनआयएने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भूपतीनगरमध्ये केंद्रीय पोलिस दलाचा मोठा ताफा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 2 डिसेंबर 2022 रोजी भूपतीनगर पोलिस स्टेशनच्या भगवानपूर 2 ब्लॉकच्या अर्जुन नगर ग्रामपंचायतीच्या नैराबिला गावात रात्री 11 वाजता एक भयानक बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत तृणमूलचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना, त्यांचा भाऊ देवकुमार मन्ना आणि विश्वजित गायन यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने या घटनेचा तपास हाती घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयए स्फोटाच्या घटनेचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.