पॅरिस : निरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. या आधी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकले होते. भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यातच दिसून आली. अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. अर्शद नदीमनं टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटर होता, त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले होते. यामुळे नीरज चोप्राने रोप्य तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदकावर नाव कोरलं.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक..
नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यामुळं भारतीयांकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निरज चोप्राकडून सुवर्ण पदकाच्या अशा लागून राहिल्या होत्या. नीरज चोप्रानं पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत आपल्या पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
नीरज समोर मुख्य आव्हान असलेल्या अँडरसन पीटर्सनं पहिल्या प्रयत्नात 85 मीटर पेक्षा कमी अंतरावर पहिला थ्रो टाकला तसेच त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या वॉलकॉटनं पहिल्या प्रयत्नात 86.16 मीटर भाला फेकला. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जर्मनीच्या वेबरचा पहिला प्रयत्न देखील अपयशी ठरला. केनियाच्या येगोनं पहिल्या प्रयत्नात 80.29 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं पहिला थ्रो फाऊल टाकला.
दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो..
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. जर्मनीच्या वेबरनं दुसऱ्या प्रयत्नात 87.33 मीटर थ्रो टाकला. केनियाच्या येगोनं दुसऱ्या फेरीत 87.72 मीटर थ्रो टाकला. नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो टाकला. नीरज तिसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नासारखी कामगिरी करु शकला नाही तर चौथा प्रयत्न फाऊल गेला. नीरज चोप्रानं पहिल्या पाच प्रयत्नांपैकी केवळ दुसरा योग्य ठरला तर इतर चार प्रयत्न बाद ठरले.