Rajya Sabha MP Retirement : नवी दिल्ली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे, आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील 6 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. राज्यसभेतून वर्षात तब्बल 68 राज्यभसा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.
निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. तर, 6 खासदार महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महाराष्ट्रातून कोणते खासदार निवृत्त होणार?
- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
- केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
- काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
- भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
- राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण
उत्तर प्रदेशातील तब्बल 10 राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा खासदारांचा समावेश आहे.पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातून पाच, कर्नाटक आणि गुजरातमधून चार, ओदिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधून प्रत्येकी तीन, झारखंड आणि राजस्थानमधून प्रत्येक दोन, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगढ, हरियाणामधून प्रत्येकी एक खासदार निवृत्त होणार आहे.