श्योपुर : मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील पवन नामक चित्त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. हा चित्ता नामिबियातून आणला होता. याच महिन्यात ५ तारखेला पाच महिन्यांच्या गामिनी नामक आफ्रिकन चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चालू महिन्यातील ही दुसरी घटना आहे. पवन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कुनोतील एका ओढ्यालगतच्या झुडपात निपचित पडलेला दिसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृत चित्त्याचा डोक्यासह शरीराचा पुढील भाग पाण्यात होता. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. प्रथमदर्शनी या चित्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसते. परंतु, नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता कुनो उद्यानात २४ चित्ते उरले आहेत. यांमध्ये १२ प्रौढ तर तितक्याच बछड्यांचा समावेश आहे. सध्या हे सर्व चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानातील सुरक्षित क्षेत्रात अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.