अमरावती: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान त्यांना मिळत आहे. राजधानी अमरावती येथील गन्नावरम विमानतळ परिसरातील केसरपल्ली आयटी पार्कवर आयोजित शपथ सोहळ्यात चंद्राबाबू हे सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी पद व गोपनियतेची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू हे ३० वर्षांपूर्वी १९९५ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी २००४ पर्यंतं मुख्यमंत्री पद भूषवले. पण, २००४ मध्ये तेलगू देसम पक्षाचा दारुण पराभव झाला. तेव्हा वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री बनले. जवळपास एक दशकानंतर व संयुक्त आंध्र प्रदेशची तेलंगण व आंध्र प्रदेश अशी फाळणी झाली. त्यानंतर, २०१४ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू पहिले मुख्यमंत्री बनले. पण, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला व वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री बनले. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांचा पराभव झाला.