भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका संग्रहालयात फिल्मी स्टाईल चोरीची घटना घडली आहे. एक चोर तिकीट घेऊन या संग्रहालयात आला आणि संग्रहालय बंद होत असताना पायऱ्यांखाली लपला. अंधार पडल्यावर या चोरट्याने सुमारे 15 कोटी रुपयांचा माल गोळा केला आणि पळून जाण्यासाठी भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भिंत सुमारे 25 फूट उंच होती, त्यामुळे उडी मारताना तो कॅम्पसमध्ये पडला आणि जखमी झाला. सकाळी संग्रहालय उघडले असता हा चोर जखमी अवस्थेत आढळून आला. संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात बोलावून त्याला ताब्यात दिले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी चोरट्याची चौकशी केली आणि त्याने जे काही सांगितले, त्यामुळे त्यांना धक्काच बसला. वास्तविक, या चोराने बिहार राज्यातील रहिवासी विनोद अशी आपली ओळख सांगितली आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी तो चार महिन्यांपूर्वीच भोपाळला आला होता. त्याचवेळी तो आपल्या मित्रासह संग्रहालयाला भेट देण्यासाठी आला आणि येथील कमी सुरक्षा व्यवस्था पाहून त्याने चोरीचा कट रचला. या घटनेसाठी तो अनेक दिवसांपासून संग्रहालयात चोरीसाठी चकरा मारत होता.
रात्र पायऱ्याखाली घालवली
याच क्रमाने रविवारी संध्याकाळी तो तिकीट घेऊन संग्रहालयात दाखल झाला आणि संग्रहालय बंद झाल्यावर तो पायऱ्यांखाली लपला. सोमवारी संग्रहालय बंद असल्याने सकाळी उजाडल्यावर तो निवांतपणे संग्रहालयातील मौल्यवान वस्तू गोळा करून पळून गेला. आता अडचण अशी होती की, बाहेर 25 फूट उंच भिंत होती. त्याने अनेक वेळा चढण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी संग्रहालय उघडले असता चोरटा भिंतीजवळ जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे.
राज्य सरकारच्या या संग्रहालयात गुप्त काळापासून ते मुघल काळापर्यंतच्या काळातील सोने, चांदी आणि इतर धातूंची नाणी, शिल्पे आणि इतर मिश्र धातूंच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंची किंमत करोडोंमध्ये आहे. चोरट्याने यातील अनेक वस्तू गोळा केल्या होत्या. म्युझियम व्यवस्थापनानुसार चोराने नेलेल्या वस्तूंची किंमत सुमारे 15 कोटी रुपये असू शकते. चोर भिंतीवर चढू शकला नाही हे सुदैव, अन्यथा या संग्रहालयात ठेवलेला अनमोल वारसा चोरीला गेला असता. पोलिसांनी सांगितले की, चोराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्याकडे एक मोठी बॅग सापडली. संग्रहालयातून चोरीला गेलेल्या सर्व वस्तू या बॅगेत ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आरोपींच्या बॅगेतून कुलूप तोडण्यासाठी आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारेही जप्त केली आहेत.