नवी दिल्ली: संपूर्ण भारत हवाई वाहतुकीने जोडण्याच्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या ‘सी प्लेन’ परिचालनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वप्रणालीचा शुभारंभ नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. यावेळी प्रादेशिक आणि दुर्गम भागातील दळणवळणामध्ये ‘सी प्लेन’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून सी प्लेनचा पर्याय आता दृष्टिक्षेपात आला असल्याचे नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत निसर्गाचे मोठे वरदान भारताला लाभले आहे. त्याचे एक महत्त्वपूर्ण अंग म्हणजे समुद्र आणि समुद्रकिनारे आहेत. त्यांचा वापर सर्वसामान्य लोकांना महत्त्वपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होऊ शकतो. त्याच हेतूने मोदी सरकारने सी प्लेनचा उपयोग नागरी हवाई वाहतुकीसाठी करण्याचे ठरवले असल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, उडान योजनेअंतर्गत सी प्लेन्सच्या परिचालनासंदर्भातही तरतूद करण्यात आली आहे.
२०२० मध्ये साबरमती रिव्हरफ्रंट आणि स्टॅट्यू ऑफ युनिटी दरम्यान सी प्लेन मार्गाची सुरुवात झाली. यातून सी प्लेन वाहतुकीबाबतच्या अमर्याद शक्यता समोर आल्या. तसेच काही आव्हानांचाही सामना करावा लागला. त्यातून वॉटर एअरोड्रोम निर्मितीत अडथळे उत्पन्न झाले. परंतु, या आव्हानांतूनच मार्ग काढत आता सरकारने सी प्लेनच्या परिचालनासंदर्भातील सातत्य आणि विकास सुनिश्चित करण्याकरिता अधिक लवचिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन अंगीकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले विकसित भारताचे उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक क्षेत्र मोलाची कामगिरी बजावणार असल्याचा आशावादही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, नायडू यांनी नागरी हवाई वाहतुक क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या धोरणांचा आढावा घेतला.