Agra Tajmahal : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महालबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जागतिक आश्चर्यामध्ये समावेश असलेल्या या वास्तूवर संततधार पावसानंतर अनेक तडे पडले आहेत. तर घुमटावर काही ठिकाणी रोपं उगवण्यास सुरुवात झालेले दिसून येत आहे.
आग्रा येथील प्रसिद्घ ताजमहाल ही वास्तू विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहता हा स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा वाद निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे घुमटाच्या उत्तरेकडील संगमरवरी दगडांमध्ये ही वनस्पती वाढत असल्याचे बोलले जात आहे.
टुरिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीव महासचिव शकील चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य घुमटाजवळाच्या चारही दरवाजाजवळ अरबी भाषेत लिहलेल्या कुराणमधील आयतेंवरील मजकूर फिका पडण्यास सुरुवात झाली आहे. शादी मशिदीसमोरील मोझॅक स्टोन नक्षीकामापासून ते फरशीवरही काहीसे नुकसान झाले आहे. मुख्य थडग्याजवळ आणि घुमुटाच्या भिंतींवरही भेगा पडल्याचे दिसत आहेत. मात्र भिंतींना तडे जाणे, पाणी टपकणे तसेच झाडे-झुडपे उगवणे या प्रकारामुळे स्मारकाची प्रतिष्ठा मलीन होत चालली आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताजमहालचा ढाचा सुरक्षित आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. देखभालीसाठी येणाऱ्या निधीचे ऑडिटदेखील केले जाते. टुरिस्ट गाइड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दान यांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, पावसात ताजमहाल आणि आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्मारकाबाबतची चिंता वाढली आहे.