भोपाळ: मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भोपाळमध्ये झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीदरम्यान मोहन यादव हे मागे बसले होते आणि त्यांच्या नावाची घोषणा होताच ते स्वत: थक्क झाले. त्यांनीच हा खुलासा केला.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर, मध्य प्रदेशचे नामनिर्देशित मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “एवढी मोठी जबाबदारी फक्त भाजपच एका छोट्या कार्यकर्त्याला देऊ शकतो. या नवीन जबाबदारीबद्दल पक्षाचा आभारी आहे. आम्ही विकासाच्या मार्गावरून राज्याला पुढे घेऊन जाऊ, असंही ते म्हणाले. मोहन यादव यांनी राजभवन येथे राज्यपाल मंगूभाई सी. पटेल यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होताच मोहन यादव यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा म्हणाले, “एक सामान्य आणि चांगला कार्यकर्ता आज विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवडून आला आहे. खूप खूप अभिनंदन.” ते म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी विधीमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यांच्याशिवाय मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यांचे खूप खूप अभिनंदन.