जबलपूर : पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने काही अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. महिन्यातून दोन वेळेस पोलीस ठाण्यात येऊन २१ वेळा राष्ट्रध्वजाला सलामी देणे आणि ‘भारत माता की जय’ असा जयघोष करण्याच्या अटीवर त्याला हा जामीन देण्यात आला.
देशाच्या प्रती जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण करणाऱ्या काही अटींवर आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो, असे न्यायमूर्ती डी. के. पालीवाल यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश देताना म्हटले. न्यायालयाने आरोपीला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी भोपाळच्या मिसरोद पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर ठाण्याच्या इमारतीवरील राष्ट्रध्वजासमोर उभे राहून २१ वेळा भारत मातेचा जयघोष करत सलामी द्यायची, अशी अट न्यायालयाने घातली आहे.
जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या जामीनदाराला हजर केल्यानंतर जामीन देण्यास सांगितले. कनिष्ठ न्यायालयातील यासंदर्भातील खटला पूर्ण होईपर्यंत निर्देश दिल्याप्रमाणे पोलीस ठाण्यात येऊन आरोपीने राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.