बिहार : बिहारमधील भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून पतीने हवालदार पत्नीसह आई आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीनंही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महिला कॉन्स्टेबल नीतू कुमारी बक्सर येथील तर पती पंकज कुमार आरा जिल्ह्यातील आहे. दोघांनी प्रेमविवाह केला असून नीतू लेडी कॉन्स्टेबल म्हणून काम करत होती. त्यांची ड्युटी नवगचियामध्ये होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची बदली भागलपूरला झाली होती. भागलपूरला बदली झाल्यानंतर लेडी कॉन्स्टेबल नीतू यांना राहण्यासाठी सरकारी क्वॉर्टर मिळालं. पत्नी नीतू हिला दिलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये बेरोजगार पती पंकज, आई आणि दोन मुलांसह राहत होता.
दरम्यान, नवरा बायकोमध्ये नेहमीच घरगुती वाद होत होते. कालांतरानं दोघांमधील वाद वाढण्यास सुरुवात झाली. पण नवरा बायकोमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यामुळे अख्खं कुटुंब उध्वस्त झालं. पतीनं आधी लेडी कॉन्स्टेबल, त्यानंतर आई आणि मुलांचा जीव घेतला, त्यानंतर त्यानं स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा बायकोमधील वादा विकोपाला गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट सापडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हत्याकांडानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे.