उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सितापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आई, पत्नी आणि तीन मुलांची निघृणपणे हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सहाजणांच्या हत्याकांडाने सितापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मथुरा येथील पल्हापूर भागात शुक्रवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली.
पहिल्यांदा आई सावित्रीवर (वय-६२) गोळीबार केला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने पत्नी प्रियांका सिंह यांच्यावर (वय-४२) गोळीबार करून डोक्यात त्याने हातोड्यानेही हल्ला केला. आई आणि पत्नीचे मृतदेह निपचित पडल्यानंतर त्याने आपल्या मुलांना देखील सोडलं नाही. गोळीबाराच्या घटनेने मुले भयभीत झाली होती. मुली अस्वी (वय-०२) व अर्ना (वय-८) आणि मुलगा आद्विक यांना उचलून तिघांनाही इमारतीवरील गच्चीतून खाली फेकून दिले.
कुटुंबातील पाचजणांची निदर्यपणे हत्या केल्यानंतर त्याने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरात त्याचा भाऊ होता. तो एका खोलीत लपून बसल्यामुळे त्याचा जीव वाचला. माथेफिरू आरोपी अनुराग हा व्यसनी होता. नशेमध्ये त्याने हे हत्याकांड केले. काही दिवसांपासून त्याच्यावर नशामुक्ती केंद्रात उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.