मुंबई : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तब्बल 70 जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 22 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी अचानक ६ ते ७ हल्लेखोर आतमध्ये शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडत येत नव्हतं आणि तिथून पळण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे अनेक जणांचा जागेवरच मृत्यु झाला.
जवळजवळ १५ ते २० मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. एवढंच नाही तर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली. या आगीत ४० टक्के भाग जळून खाक झाला आहे. विशेष बाब म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना आम्ही रशियाला ७ मार्च रोजीच दिली होती असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेनं केला आहे.
मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर ५० रुग्णवाहिका टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून १०० लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.