पुणे : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या उकाडा आणि दमट वातावरणात वाढ होताना दिसत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत असतानाच आता मात्र हे चित्र फार काळ टिकून राहणार नाही, कारण, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचला आहे. हवामान विभागानं यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, the 30th May, 2024.@moesgoi @KirenRijiju @Ravi_MoES @ndmaindia @WMO @DDNational @airnewsalerts @PMOIndia
— India Meteorological Department (@Indiametdept) May 30, 2024
नैऋत्य मोसमी मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. फक्त केरळच नव्हे, तर 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे. अशी माहिती हवामान विभागाने ट्वीट करत दिली आहे. मान्सून केरळात दाखल होण्यासाठी आयएमडीनं 31 मे ही संभाव्य तारीख असल्याचं सांगितलं होतं. पण, यंदाच्या वर्षी हे मोसमी वारे ठरलेल्या मुहूर्ताआधीच केरळमध्ये दाखल झाल्यानं अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे. सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला. आता महाराष्ट्रात आठवडाभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे.