श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्हयात सुरक्षा दलांना ‘टोरिटोरियल आर्मी’च्या एका जवानाचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान हा जवान बेपत्ता झाला होता. त्यानंतर रात्रभर त्याचा शोध घेतल्यानंतर बुधवारी त्याचे छिन्नविच्छिन्न अवस्थेतील पार्थिव हाती लागले आहे. त्याच्या शरीरावर गोळ्यांचे निशाण आहेत. यावरून त्याची हत्या झाल्याचा कयास लावला जात आहे. परंतु, दहशतवाद्यांनी या जवानाला ठार मारल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये प्राणाची बाजी लावून अतिरेक्यांशी दोन हात करणाऱ्या एका जवानावर दुर्दैवी मृत्यू ओढावला. गेल्या ८ ऑक्टोबर रोजी अनंतनाग जिल्हयातील काजवानच्या जंगलात लष्कराच्या मोहिमेत सहभागी झालेला जवान हिलाल अहमद भट अचानक मृतावस्थेत आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोळ्यांनी चाळणी झालेले विचित्र अवस्थेत त्याचे पार्थिव हाती लागले आहे. त्याची हत्या करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हिलाल अहमद भट हा अनंतनाग जिल्हयाच्या मुखधामपोरा नौगाम येथील रहिवासी आहे. काजवानच्या जंगलात तो अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांच्या जवानांनी रात्रभर सर्व परिसर पिंजून काढला होता. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी टोरिटोरियल आर्मीच्या २ जवानांचे अपहरण केल्याचे वृत्त समोर आले होते. यापैकी एक जवान अतिरेक्यांच्या तावडीतून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर इतर जवानांनी परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली होती. सीमावर्ती भागात त्याचा शोध घेण्यात आला.
यादरम्यान हिलाल अहमद भटचा मृतदेह गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे नौगाम भागावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, हिलाल अहमद भट हा ४ वर्षांपूर्वी टोरिटोरियल आर्मीत भरती झाला होता. तो एक चांगला व्यक्ती होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आणि आई-वडील आहेत.