नवी दिल्ली: भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण अर्थात मायक्रो प्लास्टिक आढळल्याची चिंताजनक बाब नवीन अभ्यासातून समोर आली आहे. मीठ आणि साखर हे मोठ्या ब्रँडचे असो की लहान ब्रँडचे, पॅकेज केलेले असो की खुले असो, या सर्वात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच याचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यावरण संशोधन संस्था ‘टॉक्सिक्स लिंक’ने यासंबंधीचे महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार बाजारात उपलब्ध सर्व प्रकारच्या मीठ व साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठासह १० प्रकारच्या मिठांचा अभ्यास करण्यात आला आहे. सोबतच ऑनलाईन आणि स्थानिक बाजारातून खरेदी करण्यात आलेल्या पाच प्रकारच्या साखरेची देखील तपासणी करण्यात आली.
अभ्यासानुसार मीठ व साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये फायबर, रिल आणि इतर तुकड्यांच्या स्वरूपात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले. या सूक्ष्म कणाचा आकार ०.१ मिलीमीटर ते ५ मिलीमीटर इतका आहे. संशोधनानुसार, मिठाच्या नमुन्यात प्रतिकिलो ६.७१ ते ८९.१५ सूक्ष्म कणाचे तुकडे आढळले. आयोडिनयुक्त मिठात प्रतिकिलो सर्वाधिक ८९.१५ सूक्ष्म कणाचे तुकडे सापडले, तर जैविक सैंधव मिठात प्रति किलोग्रॅम सर्वात कमी ६.७० तुकडे आढळले.