गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे बांधकाम सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. ही घटना ८ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
बचाव पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करत ३ कामगारांना सुखरुप ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरबी येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. शुक्रवारी पहिल्या मजल्यावर भरण्याचे काम सुरू असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ४ मजूर स्लॅबच्या मलब्याखाली गाडले गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाच्या इतर अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अथक प्रयत्नानंतर बचाव पथक आणि पोलिसांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३ मजुरांना बाहेर काढलं. त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही एक मजूर ढिगाऱ्याखाली अडकला असून त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक आणि पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या थरारक घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.
#WATCH | Gujarat: A slab of a newly constructed Medical College, collapsed in Morbi. Rescue operation underway. More details awaited. pic.twitter.com/0kWMaWrAhp
— ANI (@ANI) March 8, 2024