हरियाणा : हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणाच्या रेवाडी इंड्रस्ट्रिया भागातील धारुहेडा येथे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. येथील लाइफ लाँग फॅक्ट्रीत बॉयलर फुटल्याने ४० कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेत काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या असून रेस्क्यू टीमने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. लाँग लाईफ फॅक्ट्रीमध्ये स्पेयर पार्ट्स तयार केले जातात.
या घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ. सुरेंद्र यादव यांनी म्हटलं की, धारूहेडाच्या फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत काही कर्मचारी होरपळले आहेत. तर ४० कर्मचारी जखमी झाले आहेत. या स्फोटात एका कर्मचाऱ्याची स्थिती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. फॅक्ट्रीत स्फोट होऊन काही कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील जखमी कर्मचारी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थन करतो. सरकारने तातडीने या घटनेतील जखमींना उपचार आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी पोस्ट हुड्डा यांनी केली आहे.