यंगून : म्यानमारच्या विध्वंसक भूकंपात ‘देव तारी त्याला कोण मारी…’ या म्हणीची प्रचिती आली. देशात ५ दिवसांपूर्वी घडलेल्या विध्वंसक भूकंपात राजधानी नॅपिदॉ येथील बहुमजली इमारत कोसळली व ढिगाऱ्याखाली सुमारे १०५ तासांपासून अडकलेल्या एका २६ वर्षीय युवकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला बुधवारी मोठे यश आले. नँग लिन टून असे त्याचे नाव आहे. तो बाहेर आला असता क्षीण झाला होता. मात्र, तो शुद्धीवर होता. मदत अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नँग लिन एका हॉटेलात काम करीत होता. दुर्दैवाने त्या हॉटेलची इमारत कोसळली. अग्निशमन सेवा विभाग व तुर्कीच्या बचाव पथकाने सुमारे ११ तास राबवलेल्या मदत कार्यात त्याला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. ‘एंडोस्कोपिक कॅमरे’ वापरून व जीविताला कोणताही धोका न होऊ देता काळजीपूर्वक फरशीला भोक पाडून नँग लिनला बाहेर काढण्याची किमया अधिकाऱ्यांनी साध्य केली. दुसरीकडे, म्यानमारच्या भूकंपातील बळींचा आकडा २,७१९ झाला असून जवळपास ४,५२१ जण जखमी झाले आहेत.