लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये दोन भावांनी आपल्याच घरमालकाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. आरोपींनी घरमालकाची हत्या केली, कारण ते घर रिकामे करून दुसऱ्याला राहायला देत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. प्रकरण आलमबागमधील रामनगर भागातील आहे. पोलीस सध्या गोताखोरांच्या मदतीने मृताचा मृतदेह शारदा कालव्यात शोधत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्डिको उद्यान, आशियाना येथे राहणारे वीरेंद्र नरुला (70) यांची दोन्ही मुले सिद्धार्थ आणि गौरव वेगवेगळ्या शहरात काम करतात. आलमबागच्या रामनगर भागात त्यांचे जुने घर आहे. तेथे एक कुटुंब भाड्याने राहत आहे. 11 ऑगस्ट रोजी दुपारी वीरेंद्र यांनी पत्नी अमाला हिला भाडे घेण्यासाठी दुचाकीवरून जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते परातलेच नाही. याप्रकरणी सोमवारी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी भाडेकरू सुखविंदर उर्फ विकी आणि त्याचा भाऊ अजित यांना अटक केली. चौकशीत दोघांनी वीरेंद्रची हत्या करून मृतदेह गोसाईगंज येथील शारदा कालव्यात फेकल्याची कबुली दिली. सुखविंदर हा प्रॉपर्टी डीलर आहे. तर अजित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करतो.
सुखविंदरचे कुटुंब 14 वर्षांपासून भाड्याने राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. 11 ऑगस्ट रोजी तो भावासोबत घरी होता दुपारी दोन वाजता वीरेंद्र एका प्रॉपर्टी डिलरसह तेथे पोहोचला. घर पाहून डीलर निघून गेला आणि वीरेंद्रही घरी जाऊ लागले. मात्र, यावरून सुखविंदर आणि अजितने त्याच्याशी भांडण सुरू केले. दोन वर्षांपासून भाडे न दिल्याने वीरेंद्र हे घर रिकामे करून दुसऱ्याला देण्याची तयारी करत होते. यावरून वाद आणि नंतर हाणामारी झाली. रागाच्या भरात दोन्ही भावांनी वीरेंद्र यांची हत्या केली.
मृतदेह 12 तास घरात ठेवला
चौकशीत आरोपींनी सांगितले की, वीरेंद्र नरुला यांची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह जवळपास 12 तास घरात ठेवला होता. मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची ते समजत नव्हते. त्यांनी प्रथम जमिनीवर पसरलेले रक्त धुतले. तसेच मृतदेहाची स्वच्छता केली. त्यानंतर वीरेंद्रच्या डोक्यावर पगडी बांधण्यात आली. मृतदेह दुचाकीच्या मधोमध कोणीतरी बसला असेल अशा पद्धतीने ठेवण्यात आला होता. एका आरोपीने दुचाकी चालवली तर दुसऱ्याने मृतदेह धरला. सुमारे 20 किमीचे अंतर कापून ते रात्री उशिरा गोसाईगंज येथे पोहोचले आणि मृतदेह कालव्यात टाकून परत आले. यावेळी पोलिसांनी त्यांना कुठेही अडवले नाही. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले
वीरेंद्र यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पोलिसांनी कॅमेरे तपासले असता काही फुटेज डिलीट केल्याचे समजले. याबाबत आरोपींनी सांगितले की, सीसीटीव्ही हा महत्त्वाचा पुरावा असल्याचे त्यांना माहीत होते, त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले. डीसीपी म्हणाले की, तपासादरम्यान वीरेंद्र यांच्या जुन्या घराजवळ लावलेल्या कॅमेऱ्यांची झडती घेण्यात आली. त्यात वीरेंद्र आणि अन्य एक व्यक्ती एकत्र घरी गेल्याचे दिसून आले. त्यानंतर दोघे बाहेर जातना दिसले. काही वेळाने वीरेंद्र पुन्हा घराकडे जाताना दिसले. मात्र, ते परत आले नाही. यावरून पोलिसांचा संशय बळावला. आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे