भुवनेश्वर: काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ओडिशात एका बनावट डॉक्टरला अटक केली होती. त्याच्यावर 18 लग्नानंतर महिलांना ब्लॅकमेल करून लुटल्याचा आरोप होता. आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एकामागून एक 15 महिलांना आपली वधू बनवणाऱ्या एका व्यक्तीला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांचे खासगी व्हिडिओ बनवत त्यांना ब्लॅकमेल करून भरपूर पैसे लुटले, असल्याचेही समोर आले आहे.
आरोपींनी मुख्यतः मध्यमवयीन महिलांना लक्ष्य केले, ज्या दुसरे लग्न करू पाहत होत्या. लग्नानंतर हा व्यक्ती त्या महिलांचे शोषण करायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. तो त्यांना मारहाणही करायचा. एका नववधूने याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर या वराचे अनेक कारनामे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी एक महिला ओडिशा पोलिसांकडे आली होती. रडत रडत तिने पोलिसांना आपला त्रास कथन केला. तिने सांगितले की, तिचा घटस्फोट झाला आहे. तिला पुन्हा लग्न करायचे होते. त्यानंतर तिची एका मॅट्रिमोनियल साइटवर एका तरुणाशी ओळख झाली. एका चांगल्या पदावर नियुक्त अधिकारी असे त्यांनी स्वतःचे वर्णन केले. दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली. संवादांची मालिका सुरू झाली आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारे केले ब्लॅकमेल
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांनी त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. विविध प्रकारचे अत्याचार करू लागला. वैतागून ती परत तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. त्यानंतर तिच्या पतीने तिला काही फोटो आणि खाजगी व्हिडिओ दाखवले. यापैकी लग्नाच्या रात्रीचा एक व्हिडिओ होता, जो पतीने गुपचूप बनवला होता. त्यानंतर पतीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे द्या, नाहीतर फोटो आणि व्हिडिओ लीक करेन, असे तो म्हणाला. सुरुवातीला पिडीता त्याला पैसे देत राहिले. मात्र, ब्लॅकमेलिंगचा सिलसिला थांबत नसताना तिने पुन्हा पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीने 15 महिलांसोबत हेच कृत्य केल्याचे समोर आले आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.