कोलकाता: नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यांत विजयासह हॅट्ट्रिक साधली आहे. भाजपचा हा विजय विरोधी ‘इंडिया’ (INDIA)आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत बुधवारी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच विरोधकांच्या आघाडीला मोठा झटका बसला आहे.
६ डिसेंबरला होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, काँग्रेसने 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया अलायन्सची बैठक बोलावल्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. ममता बॅनर्जी 6 डिसेंबरला होणाऱ्या या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत, कारण त्यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. राजस्थानमध्ये भाजपने जोरदार पुनरागमन करत 115 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. तर इतरांना 15 जागा मिळाल्या.
मध्य प्रदेशात, भाजप पुन्हा एकदा 163 जागांच्या प्रचंड बहुमताने सत्तेत परतला, तर काँग्रेसला केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी इतरांच्या खात्यात एकच जागा गेली. छत्तीसगडबद्दल बोलायचे झाले तर येथे भाजपला 54 जागांसह सत्ताबदल करण्यात यश आले, तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पीएम मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, टीएमसी, आरजेडी, जेडीयू, आप, सपा, डीएमकेसह 26 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. ‘इंडिया’ आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. खरगे यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली आहे. आता सर्वांच्या नजरा 6 डिसेंबरच्या या बैठकीकडे लागल्या आहेत