India-Maldives Row : नवी दिल्ली : मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिधडताना दिसत आहेत. नुकतच, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पुन्हा एकदा ‘इंडिया आउट’चा नारा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. यासोबतच त्यांनी भारताला 15 मार्चचा अल्टिमेटम दिला आहे.
यापूर्वी मालदीवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती. सद्यस्थितीला मालदीवमध्ये 88 भारतीय सैनिक आहेत. शनिवारी (13 जानेवारी) मुइज्जू यांनी पत्रकार परिषदेत भारताचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, आम्ही लहान असू पण आम्हाला धमकावण्याचा परवाना त्यांना (भारत) मिळत नाही.
मुइज्जू यांचा 5 दिवसांचा चीन दौरा
मोहम्मद मुइज्जू त्यांचा 5 दिवसांचा चीन दौरा संपवून मालदीवला परतले. दरम्यान, मुइज्जू यांनी या दौऱ्यात चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले होते. उभय देश त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत असल्याचे म्हटले होते. मालदीवने चीनला अधिक पर्यटक पाठवण्याच्या ‘वेगवान’ प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी 10 जानेवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या.