श्रीनगर: पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. रविवारी (७ एप्रिल) पक्षाने अनंतनागमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मेहबुबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत वाहीद पारा श्रीनगरमधून आणि फैयाज मीर बारामुल्लामधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. वाहीद पारा हे पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. तर मीर फैयाज हे माजी राज्यसभा सदस्य आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी?
जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. उधमपूर लोकसभा जागेवर पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जम्मू मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात श्रीनगर मतदारसंघात १३ मे रोजी आणि बारामुल्ला मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत.