पुणे : लोकसभेच्या निकालानंतर देशातील वातावरण चांगलच तापलं आहे. दिल्लीत आज एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला जाणार नसल्याचे समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल या बैठकीला हजर राहणार आहेत. आज दिल्लीत एनडीए पुढची रणनीती आखणार आहे. सत्तास्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक झालेली आहे. यावेळी सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या सर्व विजयी खासदारांव्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांना सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या. NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत. आजच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाणार आहे.
तसेच दुसरीकडे आज दिल्लीत इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्यात यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या बैठकीला जाणार आहेत. तर शरद पवारही या बैठकीला हजर राहणार आहे.
तसेच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक पंतप्रधान मोदी घेणार आहेत. वर्तमान मंत्र्यांची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असणार आहे. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दुपारी ही बैठक पार पडणार आहे.