दिल्ली : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्सरुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अडवाणी यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अडवाणी यांना भारतरत्न प्रदान..
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात. याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न देऊन सन्मानित केलं होतं.
2015 मध्ये पद्मविभूषण..
2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे, सातवे उपपंतप्रधान राहिले होते. ते भाजप सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. लालकृष्ण अडवाणी 1998 ते 2004 या काळात सर्वाधिक काळ गृहमंत्री होते.
दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे झाला. लालकृष्ण अडवाणी यांच्या कुटुंबात त्यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी आणि त्यांचे चिरंजीव जयंत अडवाणी आहे. अडवाणींचा मुलगा आणि मुलगी दोघेही राजकारणापासून दूर आहेत.