नवी दिल्ली : नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात दांडिया रास खेळण्यासाठी गरबा प्रेमी मोठ्या उत्सहाने तयारीला लागले आहेत. अनेक जण गरब्याचा सराव करत आहेत. अशातच आता नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत भाजप नेत्यानं मांडलेल्या अजब दाव्याने अनेकांना धक्काच बसला आहे. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या बिगर हिंदूंना रोखण्यासाठी एका भाजप जिल्हाध्यक्षानं अनोखी कल्पना मांडली आहे. गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं, अशी वादग्रस्त कल्पना इंदूर भाजप जिल्हाध्यक्षांनी मांडली आहे. यामुले एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा म्हणाले की, गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं. जर ती व्यक्ती हिंदू असेल तर त्याला गोमूत्र पिण्यास हरकत नाही. कारण आजच्या जमान्यात आधार कार्ड अपडेट होतात. गरब्याला येण्यासाठी लोक डोक्यावर टिळाही लावतात. अशा परिस्थितीत पंडालमध्ये येणाऱ्या लोकांना गोमूत्र पाजल्यानंतरच प्रवेश द्यावा.
गोमूत्र प्यायल्यानं हिंदूंना…: भाजप जिल्हाध्यक्ष
पत्रकारांनी चिंटू वर्मा यांना गरब्याला येणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले की, गरब्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. लोकांनी तिळा लावून करून गरबा खेळण्यासाठी यावं. त्याचबरोबर गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र प्यायला द्यावं. कारण गाय ही आपली माता आहे आणि आपण तिची पूजा करतो. अशा परिस्थितीत हिंदूंना गोमूत्र पिण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
मोठ्या संख्येनं उपस्थित राहा..
भाजप जिल्हाध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की, गरबा हा देवीचा उत्सव आहे. आपण सर्वजण गोमूत्र वापरतो, त्यामुळे प्रत्येकानं ते प्यावं. त्यात कोणाला काय अडचण आहे? आपल्या सर्व माता-भगिनी गरबा खेळायला येतात. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येनं गरबा खेळण्यासाठी लोक एकत्र येतात. मात्र, या काळात अनेकदा महिलांच्या विनयभंगाच्या बातम्या समोर येताना दिसून येतात. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गरबा पंडालमध्ये इतर धर्माचे लोक देखील प्रवेश करतात आणि महिला आणि मुलींची छेड काढतात. या घटनांना आळा घालण्यासाठी इंदूरचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी हा दावा केला आहे.