लंडन : कोरोनाविरोधातील एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित लसीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत, जगभरातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी एकवटले आहेत. यासंदर्भात ठोस पुरावे हाती येईपर्यंत लसीचा वापर थांबविण्याच्या मागणीसाठी ऑनलाईन याचिकेची प्रक्रिया डॉक्टरांकडून राबवली जात आहे. एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित कोरोना प्रतिबंधक लसीचा वापर थांबविण्यासाठी ऑनलाईन याचिकेवर जगभरातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी केली जात आहे.
होप अकॉर्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या याचिकेतून आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा देण्यात आला आहे. या लसीमध्ये जनुक आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन वापरासाठी या लसीला मंजुरी देण्यात आली होती. पण या लसीच्या व्यापक वापरामुळे मृत्यूच्या घटनांमध्ये भर पडत असल्याची शक्यता अनेक पुराव्यांमधून दिसून येत आहे.