सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशातच आता केंद्र सरकारची लखपती दीदी या योजनेची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही नेमकी योजना काय? अर्ज कसा करायचा? हे सर्व जाणून घेऊया….
महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.
ही योजना महिला बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश केंद्र सरकारचा आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयांपासून ते 5 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
असा मिळणार लाभ?
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तरच महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.