Kuwait Fire : कुवैतच्या मंगाफ शहरात बुधवारी (12 जून) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका इमारतील आग लागून 45 भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे विशेष विमान कुवेतहून रवाना झाले आहे.
या अपघातातील सर्व 45 मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने (C-130J) भारतात आणले जात आहे. या विमानात परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हे स्वत: असणार आहेत. तसेच ते स्वत: कुवेती अधिका-यांच्या संपर्कात आहेत. हे विमान प्रथम कोची येथे उतरणार आहे. यानंतर विमान पुन्हा दिल्लीला येणार आहे, कारण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर भारतीय राज्यातील काही लोकांचाही समावेश आहे.
कुवेतमध्ये आल्यानंतर मंत्री सिंह यांनी जखमी भारतीय कामगारांवर उपचार सुरू असलेल्या पाच रुग्णालयांना गुरुवारी भेट दिली. दूतावासाने सांगितले की या कामगारांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार हळूहळू सोडण्यात येईल. त्यांच्या भेटीदरम्यान, सिंग यांनी उपपंतप्रधान शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांची भेट घेतली, ज्यांनी त्यांना मृतदेह परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.