Kolkata Rape-Murder Case : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला ट्रेनी डॉक्टरसोबत अत्यंत क्रूर, अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच देशभरातील आरोग्य सेवा 24 तासांसाठी बंद राहतील, अशी घोषणा केली आहे. गुरुवारी रात्री इंडियन मेडिकल असोसिएशनने हे जाहीर केले आहे.
आयएमए ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आधुनिक वैद्यकशास्त्राचे डॉक्टर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची सेवा देणार नाहीत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या कालावधीत रुग्णांना केवळ अत्यावश्यक सेवा पुरविल्या जाणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.
कोलकत्याच्या कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार हत्या प्रकरणात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीत सध्या जबरदस्त निदर्शने पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या असून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.