कोलकाता: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीतील सेमिनार हॉलमधून मृत डॉक्टरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कोलकाता पोलिसांनी बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांचा सिविक व्हॉलंटियर संजय रॉय याला अटक केली आहे. दरम्यान, संजय रॉय यांचा ९ ऑगस्टच्या रात्रीचा पहिला सीसीटीव्ही फोटो समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये संजय रॉय हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यानचे आहे.
घटनेच्या दिवशी संजय रॉय मद्यधुंद अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि त्याने सेमिनार हॉलमध्ये झोपलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केला होता. तुटलेले ब्लूटूथ आणि सीसीटीव्ही फुटेज सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने त्याला घटनास्थळी नेले होते आणि संपूर्ण घटना पुन्हा तयार केली होती. शुक्रवारी सीबीआयने त्याला कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संजय रॉय याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला कोलकाता येथील प्रेसिडेन्सी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
सीबीआयला सीसीटीव्ही फुटेज मिळाले
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, आरोपी घटनेच्या काही तास आधी पीडितेच्या अगदी जवळ होता. सीबीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३३ वर्षीय आरोपी काही तास आधी पीडितेवर बारीक नजर ठेवताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेकडे धोकादायक नजरेने बघताना दिसत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने सीबीआयच्या चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने असेही सांगितले की, हल्ल्यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी चाचणी आणि औषध वॉर्डमध्ये त्याने 31 वर्षीय पीडितेवर लक्ष ठेवले होते. सीसीटीव्ही फुटेजने त्यांचा दावा खरा असल्याचे सिद्ध केले. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपी लैंगिक विकृतीने ग्रस्त आहे आणि त्याच्याकडे ‘प्राण्यांसारखी’ प्रवृत्ती आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि संतप्त झालेल्या या घटनेबाबत चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तीमध्ये कोणताही पश्चाताप दिसून आला नाही, असेही सूत्राने सांगितले.