पुणे प्राईम न्यूज: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. भाजप नेत्याने महुआ मोइत्रा यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची आणि त्यांना सभागृहातून ‘तत्काळ निलंबित’ करण्याची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी केलेल्या या आरोपानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला. असे काही पहिल्यांदाच घडले नाही. याआधीही टीएमसीचे खासदार अनेकदा चर्चेत आले आहेत.
कोण आहेत महुआ मोईत्रा?
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. कोलकात्यात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर महुआ या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडनमधील एका प्रतिष्ठित बँकिंग कंपनीत काम करायला सुरुवात केली. काही काळातच त्या या कंपनीच्या उपाध्यक्ष झाल्या. यावेळी महुआ यांनी आपली चांगली नोकरी सोडून बंगालच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.
नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
लंडनमधील बँकिंग कंपनीतील नोकरी सोडून महुआ बंगालला परतल्या. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी करीमपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 2019 मध्ये महुआ टीएमसीच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभेत पोहचल्या. त्यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा ६३ हजार मतांनी पराभव केला.
‘या’मुळे चर्चेत
टीएमसी खासदार आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. यावेळी भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. यासोबतच टीएमसी खासदार आणि व्यापारी यांच्यात रोख रक्कम आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निशिकांत दुबे यांनी लोकसभा ओम बिर्ला यांना पत्र लिहून टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची आणि त्यांना सभागृहातून ‘तत्काळ निलंबित’ करण्याची मागणी केली आहे.
महुआ मोईत्रा यांचा पलटवार
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपांना उत्तर देताना टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर त्यांच्याकडे बनावट पदवी असल्याचा आरोप केला आहे. भाजपवर ताशेरे ओढत महुआ म्हणाल्या की, जर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांना अदानी प्रकरणाचा तपास केल्यानंतर मोकळा वेळ मिळाला तर ते त्यांच्याकडे चौकशीसाठी येऊ शकतात. ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवावा, असं देखील मोईत्रा म्हणाल्या.