कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आयपीएल २०२४ मधील ३६ वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ विकेटवर २२२ धावा केल्या होत्या. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं २० ओव्हरमध्ये २२१ धावा केल्या. अखेरच्या बॉलवर तीन धावांची गरज असताना आरसीबीला केवळ एक रन काढता आली.
दरम्यान, बेंगळुरूचा हा आठ सामन्यांतील एकूण सातवा पराभव आहे. त्यामुळे बेंगळुरू गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर कायम असून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. केकेआरने मात्र, यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली असून त्यांनी ७ सामन्यांतील ५ सामने जिंकले आहेत, तर 2 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत कोलकाता सध्या पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.
बेंगळुरूकडून या सामन्यात विल जॅक्स (५५) आणि रजत पाटीदार (५२) यांनी अर्धशतके केली. कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायण आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
कोलकातानं दिलेल्या २२ धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात केली. पहिल्या २ ओव्हरमध्ये आरसीबीनं २७ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट कोहली बाद झाला. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. आरसीबीचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदारनं चांगली कामगिरी केली. दोघांनी आरसीबीचा डाव सावरला. मात्र, दोघेही एकाच ओव्हरमध्ये बाद झाले.
यानंतर आरसीबीकडून फलंदाजीला आलेले कॅमरुन ग्रीन आणि लोम्रोर मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. प्रभुदेसाईनं 24 धावा करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं 25 धावा करुन आरसीबीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कर्ण शर्मानं 7 बॉलमध्ये 20 धावा केल्या. त्यानं मिशेल स्टार्कला शेवटच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले.
कोलकाताकडून फिल सॉल्ट, श्रेयस अय्यस, रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमनदीप सिंगनं चांगली फलंदाजी केली. कोलकातानं या फलदाजांच्या कामगिरीच्या जोरावर २० ओव्हर्समध्ये ६ बाद २२२ धावा केल्या, तर फिल सॉल्टनं ३ सिक्स आणि ७ चौकारांसह ४८ धावा केल्या. तर, कॅप्टन श्रेयस अय्यरनं १ सिक्स आणि ७ चौकारांसह ५० धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं १ विकेट तर, यश दयाळनं २ विकेट, लॉकी फर्गुयसननं २, तर कॅमरुन ग्रीननं १ विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.